नोंदणी क्र. E-1817(Bom.)
२८ ऑक्टोबर - आंतरशालेय स्पर्धा १ - वृत्तकथन
हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाकडून आपण वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
आपण चालवत असलेल्या शालेय उपक्रमांच्या माध्यमातून विविध आंतरशालेय स्पर्धांचे नियोजन केले आहे. पैकी प्राथमिक विभागाची पहिली स्पर्धा रविवार दिनांक २८.१०.२०१८ रोजी ११.३० ते १:३० या वेळेत पार पडली. इयत्ता 1ली ,2री च्या विद्यार्थ्यांसाठी कोलाजकाम स्पर्धा होती.स्पर्धेत मालाडच्या 5 आणि गोरेगावच्या 4 अशा एकूण 9 शाळांनी सहभाग घेतला. उद्घाटनासाठी मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी श्री.जोशी, श्री.आठले, श्री.नानिवडेकर ,श्री.वर्तक उपस्थित होते .
कोलाजकामासाठी सहा रंगांचे रंगविलेले तांदूळ आणि फेविकोल हे साहित्य प्रत्येक विद्यार्थ्यास सन्मित्रकडून देण्यात आले. कोलाजकामासाठी देण्यात आलेले चित्र शाळांना सरावासाठी स्पर्धेच्या सूचनापत्राबरोबर देण्यात आले होते. त्यामुळे सर्व शाळांना विषय परिचयाचे होते . विद्याभारती ह्या शैक्षणिक संघटनेच्या, प्रशिक्षण वर्गासाठी सन्मित्रमधे आलेल्या दुसऱ्या शाळेतील शिक्षकांनी परीक्षण करून विजेते तीन क्रमांक काढले आणि सन्मित्रला सहकार्य केले . संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री. नारायण सामंत यांची भाची कु.स्वराली तेंडोलकर हीने 11 ते 3 पूर्ण वेळ थांबून संपूर्ण स्पर्धेचे छायाचित्रीकरण करण्यास सहकार्य केले. 8 पालक प्रतिनिधींनी स्पर्धा संपेपर्यंत थांबून मदत केली. प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सकाळी 10 पासून स्पर्धा संपेपर्यंत उपस्थित होते. श्रीमती अनघा चंद्रात्रे यांनी काढलेल्या छान रांगोळ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्पर्धेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी ,पालक आणि पालक प्रतिनिधी, सर्व शिक्षक वर्ग यांच्यासाठी चहापान, बिस्किटे, आणि भेळ अशी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
स्पर्धा संपल्यानंतर लगेचच बक्षीस समारंभ करण्यात आला. मंडळाचे सन्माननीय खजिनदार श्री. अजितजी वर्तक यांच्या हस्ते प्रथम सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रे आणि 500 रु,300 रु,200 रु.अशी बक्षीस रकमेची पाकिटे देऊन गौरविण्यात आले.
मुख्याध्यापिका सौ. सावंतबाई यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.