top of page

इतिहास व ऋण निर्देश

Demee Peeuee meeqvce$e ceb[Ue®ee Þeer-ie-Ces-Mee .......

१९५५ साली गोरेगाव ग्रामपंचायत होती व लोकसंख्या वीस हजाराच्या आसपास असावी. गोगटेवाडी परिसरात वस्ती वाढत होती आणि शिक्षणाच्या सोयीची गरज लोकांना जाणवू लागली. त्याच दरम्यान कै. मृणालिनी चिरमुले बाईंचा पूर्व प्राथमिक चा कोर्स झालेला असल्याने, पाच मुले घेऊन त्यांच्या लहानश्या जागेत शिशुमंदिर सुरु केले, पण पुढील वर्गांचे काय हा प्रश्ण होताच.

१९५७/५८ साली बाळासाहेब कानिटकर,  एकनाथ जोशी,  बापूसाहेब  सोवनी , डॉ . व. मो. फाटक ई. गोरेगावातिल स्थानिक मंडळींनी सन्मित्र मंडळ,गोरेगाव  ही संस्था स्थापन केली. कै. मृणालिनी चिरमुले व कै. न. द. कुलकर्णी यांनी आपले चालू असलेले वर्ग बंद करून सन्मित्र मंडळ, गोरेगाव या संस्थेच्या पूर्व प्राथमिक विभागात विलीन केले. श्री. रामभाऊ नाईक (सध्याचे मा. राज्यपाल, उत्तर प्रदेश) यांच्या १० x १० च्या दोन खोल्यात हे वर्ग  सुरु झाले. चिरमुले बाईंची मुलगी नंदिनी (आताची सौ. अनघा बिनीवाले) ह्या वर्गातील पहिली विद्यार्थीनी, हा योगायोगच म्हणावा लागेल.

वर्ग क्रमशः वाढत गेले त्यामुळे तीही जागा कमी पडू लागली. श्री. बाळासाहेब कानिटकर यांनी , श्री. मधुसूदन वखारिया (बाळासाहेबांचे सिद्धार्थ कॉलेज मधील विद्यार्थी) ह्यांच्या सहाय्याने कै श्रीमती दोसीबाई जीजीभॉय ह्यांच्याकडे शाळेच्या जागेसाठी विनंती केली आणि आज शाळा उभी आहे तो प्लॉट त्यांनी शाळेला बक्षिसपत्र म्हणून दिला आणि त्या सन्मानार्थ आपल्या प्राथमिक शाळेचे नाव "बैरामजी जीजीभॉय" असे झाले. त्यांनी दिलेल्या मोकळ्या जागेत पहिल्यांदा लाकडी फळ्यांचे स्टेज उभे करण्यात आले, त्याला गोणपाटांचे पडदे सजले आणि वर्ग तयार झाले. विद्यार्थी नवीन वर्ग मिळाल्याच्या खुशीत होते. अशी प्राथमिक चार वर्षे गेली व शाळेतील विद्यार्थ्यांची चवथीची परीक्षा मुन्सिपल शाळेत झाली व शाळेला मान्यता मिळाली.  

आजूबाजूच्या लोकांना संस्थेची शाश्वती वाटू लागली व विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली. फळ्यांचे  स्टेज जाऊन पत्र्याची शेड उभी राहिली. त्यासाठी मंडळाचे सभासद आपले व्यवसाय सांभाळून रात्र रात्र खपत असत व शारीरिक श्रमांबरोबर आपापल्या जागाही शाळेतील मुलांना वापरावयास देत असत. संस्थेचे सदस्य आर्किटेक्ट कै. श्री सदानंद(दादा) वैद्य यांनी इमारतीचा आराखडा तयार केला व विनामूल्य काम करून कै. श्री. एकनाथ जोशी ह्यांना एक मजबूत ईमारत उभी करण्यात सहयोग दिला. ह्या बिल्डिंग कमिटी मध्ये डॉ. गावस्कर,  कै. श्री. ओक, श्री. हसमभाई दलवाई, कै. श्री. वर्तक व कै. श्री. केरकर होते. श्री. हसमभाई दलवाई ह्यांच्या आपल्या विटभट्टीतील विटा नवीन इमारतीसाठी वापरण्यात आल्या. नवीन ईमारत चालू असताना चार महीने दोन वर्ग कै. श्री. कानिटकर व कापरेकर यांचे घरात चालत असत. विशेष म्हणजे शेजारील मंडळींनीही मुलांचा त्रास होतो असे कधी म्हंटले नाही.

 

सस्थेला पैशाची गरज होतीच. मासिक २रु/५रु याप्रमाणे ५० व्यक्तींकडून धनसंचय केला जात होता आणि त्यातून शाळेचा खर्च भागवला जात होता. सुरवातीला शिक्षकांना पगार अत्यल्प होता, साहित्यही अपुरे होते परंतु शिक्षकांनी आपलीच शाळा ह्या भावनेने काम केले. साहित्य व जागा कमी अशी कधीही तक्रार केली नाही. प्राथमिक अवस्थेत शाळेचे लेखन जमाखर्च व्यवस्थित ठेवण्यात कै. श्री. पराडकर गुरुजी, कै. बाबा सोहनी यांनी खूप परिश्रम घेतले.

१९६२ साली चवथीच्या परीक्षेसाठी शाळेच्या १० मुलांना म्युन्सिपल शाळेत पाठवण्यात आले आणि विशेष म्हणजे त्यातील ९ मुले ही एकूण बसलेल्या २०० विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दहात होती. त्याच वर्षी ई. ५वीचा वर्ग सुरू झाला व क्रमश: एक एक वर्ग वाढत जाऊन १९६८ साली प्रथम, एस. एस. सी. परीक्षेला विद्यार्थी पाठवण्यात आले. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. उपाध्ये ह्यांनीही खूप कष्ट घेतले व  मुलांच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शाळेची जागा शाळेच्या वर्गांसाठी पुरत होती पण शाळेला मैदान नव्हते व इतर लहान मोठ्या कार्यक्रमांसाठीही शाळेची  जागा नव्हती, म्हणून कै. बाळासाहेब कानिटकरांच्या विंनंतीवरून बैरामजी जीजीभॉय प्राईव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने आपला आणखी एक मोठा प्लॉट सन्मित्र मंडळ, गोरेगावला बक्षिशपत्र म्हणून दिला.

सामाजिक बांधीलकीच्या भावनेने प्रेरित होवून मंडळाच्या सर्व सदस्यांनी हालअपेष्टा व आर्थिक झळ सोसून, पालकांचे व हितचिंतकांचे सहकार्य मिळवून गोरेगाव परिसरात साठ च्या दशकात  एक आदर्श संस्था निर्माण केली व शाळेच्या इमारतीबरोबर शाळा स्वत:चे पायावर उभी राहिली. दोन खोल्यातून झालेली सुरवात, आज उभ्या असलेल्या वास्तूत विद्यार्थ्यांसाठी १२ वर्ग (सर्व वर्ग खोल्यामध्ये ई-लर्निंग ची सुविधा), स्वतंत्र संगणककक्ष (३० संगणक), आधुनिक प्रयोगशाळा, २ कार्यालये , शिक्षककक्ष व दोन सभागृहे (केशव व माधव सभागृह) व ग्रंथालय आहेत.

“विद्याभारती” ह्या संस्थेने विकसित केलेल्या ‘शिशुवाटिका’ ह्या शिक्षण पद्धतीचा अवलंब आपण पूर्व प्राथमिक च्या विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. मुलांचा समग्र आणि सर्वांगीण विकास व्हावा या करिता मुलांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याच्या जोडीला वर्षभर येणार सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

मराठी माध्यम कायम ठेवून, इंग्रजी संभाषण वर्ग , संगणक प्रशिक्षण , पाचवी पासून गणित व शास्त्र विषयासाठी इंग्लिश असे वेगवेगळे उपक्रम राबवल्यामुळे एकीकडे मराठी शाळा बंद होत असताना आपल्या सन्मित्र मंडळाचाचा आलेख मात्र उंचावत आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी शारीरिक व ईतर सर्व आंतरशालेय गुणवत्ता स्पर्धांमध्ये उत्तम यश प्राप्त करत आहेत. संस्थेचा हा साठ वर्षाचा प्रवास रोमांचकारी आहे. गत साठ वर्षात मोलाचे योगदान दिलेल्या संस्थाचालक, पालक, हितचिंतक, व आजी माजी शिक्षक ह्याप्रती संस्था कायमच ऋणी राहील.

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले

bottom of page